Marathi Poem: आईपण सरता सरत नाही

आईपण सरता सरत नाही…..

बाळाच्या पहिल्या श्वासाबरोबर,
जन्म घेते एक आई.
बाळ काही कायम बाळ रहात नाही,
पण, आई मात्र आयुष्यभर असते फक्त आई.
मायेची नाळ काही आयुष्यभर तुटत नाही.
आईपण सरता सरत नाही…..

आता बाळचं असतं तिचे विश्व,
त्याचे हसणे, त्याचे रडणे,
त्याची भूक, त्याची झोप,
त्याची शिशी आणि त्याची शूशू,
याशिवाय तिला काहीच सुचत नाही.
आईपण सरता सरत नाही….

सोनुल आता बसू लागतं, रांगू लागत,
दुडूदुडू चालू लागत.
आणि एक दिवस,
घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडतं.
बाहेरच्या जगाच्या भितीने आईचे हृदय धडघडतं.
सोनुल परत येईपर्यंत तिच्या जिवाला काही शांतता नाही.
आईपण सरता सरत नाही…..

सुरवंटाच आता फुलपाखरू होतं,
फुलपाखरासारखचं त्याला जपायला लागतं.
आईची असते आता तारेवरची कसरत.
लेकराशी नक्की कसं वागायचं, तिला काही कळत नाही.
आईपण सरता सरत नाही……

कानात वारा शिरलेल्या वासरापरी
ते हुंदडत असतं,
रोज नविन उचापती करून आईच्या हृदयाचा ठोका चुकवित असतं.
आईची परिक्षा काही संपत नाही.
आईपण सरता सरत नाही…..

आईच्या अंगाईशिवाय झोप न लागणार्या बाळाला,
आईचं बोलणं आता टोचू लागतं.
आईला काय कसही वागवलं तरी चालतं,
कारण तिला तर गृहितच धरायच असतं
पण तिच्या प्रेमाचा झरा काही केल्या आटत नाही.
आईपण सरता सरत नाही….

आपल्या पिल्लातच विश्व बघणार्या आईसाठी,
पिल्लाच्या विश्वात आता जागाच नसते.
पिल्लाच्या पंखात आता बळ आलेले असते,
आईची गरज आता संपलेली असते.
आईला मात्र हे कधी उमगतच नाही.
आईपण सरता सरत नाही……

पिल्लू आता घरट्यातून उडून जाईल,
आकाशात उंच उंच भरारी घेईल.
दोनाचे चार होतील आणि चाराचे सहा,
तेव्हा कदाचित आईचं मन कळतय का ते पहा.
आईची वेडी आशा काही संपत नाही.
आईपण सरता सरत नाही…..

ती कायम जपत रहाते आपल्या लेकराचे इष्ट,
माहीत आहे ना आपल्याला ,
काळीज काढून देणार्या आईची गोष्ट.
जित्याची खोड काही मेल्यावाचून जात नाही.
आणि आईपण काही मेल्यावाचूून संपत नाही…..